Thursday, March 22, 2007

क्रोनिए, कॅडबरी, वूल्मर... कधी थांबेल हे सत्र?

तुम्हाला याविषयी काय वाटते? ई-सकाळ वरील ही बातमी वाचा -
जागतिक क्रिकेटला सामन्यांच्या निकालनिश्‍चितीचे (मॅच फिक्‍सिंग) लागलेले ग्रहण अद्याप सुटू शकलेले नाही, हेच बॉब वूल्मर यांच्या मृत्यूने सिद्ध झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए, पाकिस्तानातील कुख्यात बुकी कॅडबरी यांच्यानंतर आता वूल्मर यांचाही काटा काढण्यात आला. "फिक्‍सिंग'च्या समुद्रातील "बडे मासे' बाहेर येऊ नयेत, यासाठी या व्यक्तींना हटविण्याचे काम योजनाबद्ध रीतीने होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, हे सत्र कधी थांबणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए याच्यासह विविध देशांच्या क्रिकेटपटूंचे सट्टेबाजांशी; तसेच बुकींशी असलेले लागेबांधे १९९९-२००० मध्ये उघड झाले. "फिक्‍सिंग' होते, या शक्‍यतेलाही त्या वेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासणीत पुष्टी मिळाली होती. निकालनिश्‍चिती केल्याची कबुली देत क्रोनिएने त्या वेळी क्रिकेटविश्‍वात वादळ निर्माण केले. वूल्मर तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक होते. क्रोनिएबरोबरच हर्शेल गिब्ज, निकी बोए, तसेच भारताचा तत्कालीन कर्णधार महंमद अजहरुद्दीन, अजय जडेजा, अजय शर्मा यांचीही नावे दोषींच्या यादीत आली होती. विशेष म्हणजे तेव्हा प्रशिक्षक असलेल्या वूल्मर यांच्यावर मात्र एकही आरोप झालेला नव्हता.
१९९९ मध्ये दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्‍वकरंडक स्पर्धेचा "टाय' झालेला सामना, तसेच वूल्मर प्रशिक्षक असताना पाकिस्तानला बांगलादेशकडून स्वीकारावा लागलेला पराभव हेदेखील "फिक्‍सिंग' होते, अशी दबक्‍या आवाजात चर्चा झाली होती. या सर्व प्रकरणाची तसेच क्रिकेटपटू व सट्टेबाज यांच्यातील संबंधांची खडानखडा माहिती वूल्मर यांना होती. हा सारा तपशील त्यांच्या "डिस्कव्हरी ऑफ क्रिकेट' या पुस्तकात येण्याची शक्‍यता होती. कदाचित हेच पुस्तक त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले असावे. या पुस्तकाच्या माध्यमातून वूल्मर काही "बडे मासे' जाहीर करणार नाहीत ना, या भीतीने ग्रासलेल्या "फिक्‍सिंग माफियां'नीच त्यांचा योजनाबद्ध पद्धतीने काटा काढला असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
१८ मार्चच्या घटनेपूर्वी वूल्मर यांना धमक्‍यांचे दूरध्वनी आल्याच्या वृत्ताला जमैका पोलिसांनीच दुजोरा दिला असून, जमैकात आलेल्या एका पाकिस्तानी बुकीला ताब्यात घेऊन त्याची चौकशीही सुरू केली आहे.
... क्रिकेटमध्ये येत असलेला पैशांचा प्रचंड ओघ पाहता, सट्टेबाज या टोकाला जाणे शक्‍य आहे. एक तर प्रचंड पैसा अडकला किंवा हरला जाण्याची भीती प्रत्येक सट्टेबाजाला असतेच. त्यातच ज्या संघावर कमी बोली आहे तोच संघ हरला, तर सट्टेबाजाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसू शकतो.
...हे सगळे लक्षात घेता, बॉलिवूडला जसे गुन्हेगारी टोळ्यांनी घेरले आहे; तसेच आता क्रिकेटला सट्टेबाजांनी घेरल्याचेही स्पष्ट झाले आहे.

No comments: